सातारा (प्रतिनिधी) – छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखा सच्चा पुरोगामी व छत्रपतींच्या गादीचे विद्यमान वारसदार निवडून यावे यासाठी सर्व समाज जाहीर पाठिंबा देत असल्याचे मत इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सामाजिक कार्यकर्ते व दलित चळवळीतील खंदे समर्थक पोपट उमापे, उमेश खंडझोडे, अमोल पाटोळे उपस्थित होते.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवडणुकीकडे देश नव्हे तर परदेशातही लक्ष लागून राहिलेले आहे. कारण, हा छत्रपतींच्या गादीचा मान आहे. मत सुद्धा छत्रपतींना आहे. ते सर्वांचे दैवत आहेत. तसेच राष्ट्रीय अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीची त्यांना जाण असून मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. गेल्या ४० वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथी इयत्ता इतिहास पुस्तकात चुकीचा संदर्भ घेऊन इतिहास सांगितला जात होता.
त्यावेळी त्यांनी ताबडतोब सरकारला हे पुस्तक बदलण्यास भाग पाडले. त्यामुळे अशा लोकराजा असलेल्या नेत्याला निवडून देणे हा सातारच्या गादीचा सन्मान आहे. असे स्पष्ट केले. जात, धर्म यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करणारे ते लोकशाहीतील खरेखुरे राजे आहेत. त्यामुळेच त्यांना सर्व समाजाकडून पाठिंबा मिळत असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले.
तसं पाहिलं तर छत्रपतींची गादी म्हणून उदयनराजे भोसले निवडून नक्कीच येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, लंडनचे घर स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव या ठिकाणी स्मारक, लहुजी वस्ताद यांचे स्मारक आणि मागासवर्गीयांना शिक्षणामध्ये व अनेक ठिकाणी त्यांची गुणवत्ता वाढीसाठी बार्टी, आरर्टी अशा संस्था उभा करण्याचे काम हे महायुतीने केलेले आहे.
खरं म्हणजे कोल्हापूरची गादी ही धाकटी आहे. त्या गादीच्या महाराजांना निवडून द्या आणि थोरल्या गादी बदल वेगळी भूमिका घेणारया शरद पवार यांना त्यांच्या पुतण्याने चोख उत्तर दिलेले आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना निवडून देण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले.