पंजाब विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टी (आप) आता राज्यसभा निवडणुकीची तयारी करत आहे. पंजाबमधील राज्यसभेच्या 5 जागांसाठी 31 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. अशातच ‘आप’ने दिल्लीचे आमदार आणि पंजाबचे पक्ष प्रभारी राघव चढ्ढा यांना राज्यसभेचे उमेदवार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्रोफेसर संदीप पाठक आणि क्रिकेटर हरभजन सिंग हे देखील राज्यसभेसाठी अर्ज दाखल करू शकतात.
राघव चढ्ढा यांची राज्यसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांचे वय 33 वर्षे आहे. जर चड्ढा राज्यसभेत पोहोचले तर ते देशातील सर्वात तरुण राज्यसभा खासदार असतील. याआधी 35 वर्षीय मेरी कोम सर्वात तरुण खासदार ठरली होती. पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागा ‘आप’ने जिंकल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत ‘आप’ 5 जागा जिंकू शकेल, असे मानले जात आहे.
राघव चड्ढा 2020 मध्ये दिल्लीच्या राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यापूर्वी त्यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. आपचे चार उमेदवार जवळपास निश्चित मानले जात आहेत. पंजाबमधून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चढ्ढा यांच्याशिवाय प्राध्यापक संदीप पाठक यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंगही पंजाबमधून राज्यसभेचा उमेदवार असेल. याशिवाय लव्हली विद्यापीठाचे कुलपती अशोक कुमार मित्तल आणि लुधियानाचे व्यापारी संजीव अरोरा यांनाही उमेदवारी दिली आहे.