पॅरिस : जगावर मागील तीन आठवड्यापासून युध्दाचे सावट कायम आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धात कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, रशियाने केलेले युद्ध हे इतिहासात युद्ध गुन्हे म्हणून नोंद होईल असे संतापजनक वक्तव्य युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी रशियाने देशात दहशतवादी पाठवले असल्याचा दावा देखील युक्रेनकडून करण्यात आला आहे.
वोलोदिमिर झेलेन्स्की यांची हत्या करण्यासाठी रशियाकडून आणखी एक टीम देशात दाखल झाली असल्याचा दावा संरक्षण मंत्रालयाने केला आहे. फक्त झेलेन्स्कीच नाही तर इतर अनेक मोठ्या राजकारण्यांनाही ही टीम टार्गेट करणार असल्याचा धक्कादायक दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाने फेसबुक पोस्टमध्ये याविषयीची माहिती दिली आहे. यामध्ये “पुतीन यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित असलेली दहशतवाद्यांची आणखी एक टीम आज देशात दाखल होत आहे. लष्करातील वरिष्ठ अधिकारी तसंच युक्रेनच्या राजकीय नेतृत्वाला दूर करणं हे त्यांचे मुख्य कार्य आहे”.
युक्रेनमधील मारिओपोल शहरात ४०० जणांनी आश्रय घेतलेल्या एका कला महाविद्यालयावर रशियाच्या लष्कराने बॉम्बहल्ला केल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले. या बॉम्बहल्ल्यात महाविद्यालयाची इमारत नष्ट झाली असून लोक ढिगाऱ्याखाली दबले आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्यात हानी किती झाली, याबाबत लगेच काही सांगण्यात आले नाही.
नागरिकांनी आश्रय घेतलेल्या मारिओपोल शहरातील एका नाटय़गृहावर रशियन फौजांनी बुधवारीही बॉम्बवर्षांव केला होता. ‘हल्लेखोरांनी मारिओपोल या शांत शहराबाबत जे केले, तो दहशतवाद असून येती अनेक शतके त्याचे स्मरण होत राहील’, अ्से झेलेन्स्की यांनी देशाला उद्देशून केलेल्या रात्रीच्या व्हीडीओ भाषणात सांगितले.