चंदीगड – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र रणिंदर सिंग यांनी देत याबाबतच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले. पुढील वर्षाच्या सुरुवातीस पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी पक्ष श्रेष्ठींनी अमरिंदर सिंग यांना हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास पक्ष सोडू असा इशारा अमरिंदर सिंग यांनी दिला असताना देखील त्यांना हटवण्यात आले आहे.
सहाजिकच अमरिंदर सिंग यांना हटवल्यानंतर पंजाबची कमान कोणाच्या हाती सोपवण्यात येणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाली आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब काँग्रेसच्या ५० आमदारांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्र लिहीत विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याची मागणी केली होती. यानंतर ही बैठक शनिवारी सायंकाळी ५ वाजता पार पडेल असे पक्षातर्फे सांगण्यात आले.
बैठकीपुर्वीच अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधत, “अशा अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत,” असे सांगितल्याचे समजते. यानंतर अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले. अमरिंदर सिंग राजीनामा देणार असल्याची अधिकृत माहितीही त्यांच्या मुलाने दिली आहे.
अशातच आज होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये अमरिंदर यांच्या जागी सुनील जख्खर यांची वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जख्खर हे प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शीख समाजाचा (नवज्योत सिंग सिद्धू) तर मुख्यमंत्री बिगर शीख समाजाचा असे समीकरण साधू इच्छित असल्याचे जाणकार सांगतात. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जख्खर यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यांच्यानंतर प्रताप सिंग बाजवा यांचे नाव देखील चर्चेत आहे.
दरम्यान, निवडणूकपूर्व निरीक्षणांद्वारे पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बाजी मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आम आदमी पक्षाला शह देण्यासाठी काँग्रेस येथे शीख व बिगर शीख असे समीकरण साधेल असेही बोलले जात आहे.