पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

कोलकाता – भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी भाजपची साथ सोडून तृणमूल काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सुप्रियो यांनी शनिवारी टीएमसी महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुप्रियो आसनसोलचे खासदार आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलादरम्यान पदावरून हटवण्यात आले होते.

सुप्रियो यांना दोन महिन्यांपूर्वी पर्यावरण राज्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही राजकारण सोडून देईल असे म्हंटले होते.

तृणमूल काॅंग्रेसने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर बाबुल सुप्रियो हे पाचवे नेता आहेत ज्यांनी भाजपची साथ सोडून तृणमूलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाबुल सुप्रियो यांचा तृणमूलमधील प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कॅबिनेटमध्ये 43 नवीन मंत्र्यांना समाविष्ट करण्यात आले. तर काहींना पदावरून हटवण्यात आले होते. कॅबिनेटमधून बाहेर पडल्यानंतर सुप्रियो नाराज होते. त्यांनी जुलै महिन्यात एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

सुप्रियो यांनी 2014 मध्ये भाजपसोबत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांना नगरविकास राज्यमंत्री बनवण्यात आले. दरम्यान जुलैमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल करण्यापूर्वी ते पर्यावरण राज्यमंत्री पदावर होते. मात्र, यावर्षी बंगाल विधानसभा निवडणुकीत टॉलीगंज विधानसभा मतदारसंघातून 50,000 मतांनी ते पराभूत झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.