दुबई – कर्णधार लोकेश राहुलच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह पंजाबने प्लेऑफ गटात स्थान मिळवण्याच्या आशाही कायम राखल्या. हा सामना पंजाबला 13 व्या षटकांत जिंकणे अनिवार्य होते त्यात पंजाब संघ यशस्वी ठरला.
चेन्नईचा डाव 6 बाद 134 धावांवर रोखल्यावर पंजाबने 13 षटकांत 4 गडी गमावून 139 धावा करत हा सामना सहज जिंकला.
लोकेश राहुलने पंजाबला दणदणीत सुरुवात करुन दिली. त्याने मयंक आग्रवालच्या साथीत संघाला 5 व्या षटकांत 46 धावांची सलामी दिली. आग्रवाल आततायी फटका मारून बाद झाला. त्यानंतर सर्फराज खाननेही निराशा केली. यंदाच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेला शाहरुख खानही साफ अपयशी ठरला.
दरम्यान, राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. शाहरुख बाद झाल्यानंतर आलेल्या एडन मार्करमने राहुलला सुरेख साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 46 धावांची भागीदारी केली. मार्करम चांगला खेळत असताना पुन्हा एकदा अनावश्यक फटका मारून बाद झाला. त्यानंतर राहुलने मोझेस हेनरीक्सला साथीला घेत संघाचा विजय षटकार खेचून साकार केला.
या डावात राहुलने चौकार व षटकारांची आतषबाजी करत चेन्नईच्या सर्व गोलंदाजांवर वर्चस्व राखले. आपल्या नाबाद 98 धावांच्या खेळीत राहुलने केवळ 42 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व तब्बल 8 षटकार फटकावले. चेन्नईचे ड्वेन ब्राव्हो व दीपक चहर सर्वात महागडे गोलंदाज ठरले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
त्यापूर्वी चेन्नईकडून फाफ डुप्लेसी याने 76 धावांची खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून देण्यात मोलाची कामगिरी केली. त्याने आपल्या खेळीत 55 चेंडूत 8 चौकार व 2 षटकार फटकावले. त्याचा अपवाद वगळता चेन्नईच्या एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. पंजाबकडून अर्शदीप सिंग व ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
पंजाबला प्लेऑफच्या आशा कायम राखण्यासाठी या सामन्यात काही गणितांच्या आधारावर विजयाची गरज होती. जर धावांचा पाठलाग करण्याची वेळ आली तर हा सामना त्यांना 13 व्या षटकात जिंकावा लागणार होता. तेच त्यांनी केले व विजय साकार केला. आता प्लेऑफसाठी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स यांच्याशी पंजाबची स्पर्धा होणार असून तीनही संघांचे गुण समान झाले तर नेट रनरेट ज्या संघाचे सरस असेल तो संघ प्लेऑफला पात्र ठरणार आहे.
संक्षिप्त धावफलक –
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 134 धावा. (फाफ डुप्लेसी 76, रवींद्र जडेजा नाबाद 15, ख्रिस जॉर्डन 2-20, अर्शदीप सिंग 2-35).
पंजाब किंग्ज – 13 षटकांत 4 बाद 139 धावा. (एडन मार्करम 13, मयंक आग्रवाल 12, लोकेश राहुल नाबाद 98, शार्दुल ठाकूर 3-28, ड्वेन ब्राव्हो 1-48).