नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लोककल्याणकारी योजनांमुळे आणि त्यांनी यशस्वीपणे राबवलेल्या विकासाच्या मॉडेलमुळेच दिल्लीत महागाई दर देशातील राष्ट्रीय महागाईदरांपेक्षा सर्वात कमी असल्याचे आपचे नेते राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे.
देशातील महागाईचा दर जुलैमध्ये 7.44 टक्क्यांच्या 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.ऑगस्ट मध्ये हा दर 6.83 इतका झाला, पण दिल्लीतील महागाईचा दर राष्ट्रीय महागाई दरापेक्षा जवळपास निम्म्याने कमी आहे असे चड्डा यांनी म्हटले आहे.
आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक कल्याणकारी मॉडेल दिले आहे. मी याला अरविंद केजरीवाल महंगाई राहत मॉडेल म्हणेन, ज्या अंतर्गत लोकांना मोफत शिक्षण, आरोग्य आणि पाणी उपलब्ध आहे”
चड्डा पुढे म्हणाले,”आम्ही दिल्ली राज्यातील नागरीकांच्या हितासाठी ज्या योजना राबवल्या आहेत त्याची भाजपने खिल्ली उडवली. आमच्या योजना म्हणजे रेवडी वाटप आहे असे ते म्हणाले होते असा दाखलाही राघव चढ्ढा यांनी दिला. या रेवडी नसून प्रीपेड सेवा आहेत. लोक या सेवांसाठी कर भरतात. अरविंद केजरीवाल या योजनांद्वारे तुमचे पैसे परत देतात,असे राघव चढ्ढा यांनी नमूद केले.