चंदीगड – विरोधी पक्षनेते ‘प्रताप सिंग बाजवा’ यांनी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना त्यांच्या अभिभाषणात “माझे सरकार” हा शब्दप्रयोग करू नये, अशी सूचना केल्यानंतर अभिभाषणाच्यावेळीच सत्ताधारी आप आणि विरोधी कॉंग्रेसच्या आमदारांमध्ये आज जोरदार वादावादी झाली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी आपले अभिभाषण सुरू केले तेव्हा कॉंग्रेस नेते बाजवा यांनी पुरोहित यांना रोखले आणि त्यांनी आपल्या अभिभाषणात हा शब्दप्रयोग करू नये असे सांगितले.
हे सरकार तुम्हाला ओळखत नाही,असे बाजवा यांनी पुरोहित यांना सांगितले, आणि त्यांनी आप सरकार आणि राजभवन यांच्यातील भांडणाचा उल्लेख केला.त्यावर राज्यपालांनी बाजवा यांना सांगितले की, राज्यपालांनी अभिभाषणात सरकारचा उल्लेख आपले सरकार असा करायचा असतो ही प्रथा आहे, त्यावर कोणताहीं वाद उपस्थित केला जाऊ नये. पण त्यानंतर राज्यपालांनी बाजवा यांचे म्हणणे मान्य करीत मी आता माझे सरकार न म्हणता, केवळ सरकार असा शब्दप्रयोग करीन.
त्यावेळी आम आदमी पक्षाच्या आमदारांनी राज्यपालांच्या भूमिकेला जोरदार आक्षेप घेतला. राज्यपालांनी सरकारचा उल्लेख माझे सरकार असाच केला पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही धरला. त्यावेळी राज्यपालांनी त्यांचे म्हणणे मान्य करीत पुढील भाषणात माझे सरकार असाच उल्लेख सुरू केला. त्यानंतर कॉंग्रेसच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला.