पुणे – गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत पीछेहाट झालेल्या पुणे शहराने यंदा जोमाने कमबॅक केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 48 शहरांमध्ये पुण्याला देशात पाचवा क्रमांक मिळाला आहे. तर या स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या 4320 शहरांमध्ये पुणे देशात 10 वे आले आहे.
मागील वर्षी एकूण स्पर्धेत पुणे 37 व्या क्रमांकावर होते. तर दहा लाखांच्या पुढील लोकसंख्येत देशात 15 व्या क्रमांकावर होते. दरम्यान, स्वच्छ भारत
अभियानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सफाई मित्र सुरक्षा पुरस्कार आणि कचरा मुक्त शहर पुरस्कारासह बेस्ट सस्टेनेबल बिग सिटीचे प्रथम पारितोषिक मिळवित तीन पुरस्कारांवर पुण्याने मोहोर उमटविली.
शनिवारी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त अजित देशमुख, स्वच्छ सर्वेक्षण उपायुक्त आशा राऊत तसेच सहायक आरोग्य अधिकारी केतकी घाडगे यांनी स्विकारले.
कोविड काळामध्ये पुणे प्रशासन सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केलेले अथक परिश्रम नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व स्वच्छ भारत पुणे महानगरपालिका नागरिक स्वयंसेवी संस्था यांचे सांगीतिक प्रयत्न व नावीन्यपूर्ण प्रकल्पाचा अंतर्भाव यामुळे हा सन्मान प्राप्त झाल्याच्या भावना याबाबत बोलताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केल्या.