पुणे – मागील काही दिवसांपासून मुक्काम ठोकलेल्या पूर्वमोसमी पावसाने शुक्रवारी पुन्हा एकदा शहर-उपनगरांना झोडपून काढले. यात कात्रज येथे तब्बल 45 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत पाणी साचले होते. शनिवारी देखील शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे.
शुक्रवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांसह स्वारगेट, हडपसर, कोथरुड, पाषाण, कात्रज आदी उपनगरांतही पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात काही अंशी गारवा निर्माण झाला आहे. मात्र, यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भविण्याची भीती आहे.
कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. यातच शहरात विविध ठिकाणी विकासकामे, दुरुस्ती आदीची कामे सुरु असल्याने रस्त्यांवर माती, राडारोडा पसरला आहे.
त्यामुळे रस्ते देखील निसरडे झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. आशय मेजरमेंटने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कात्रज आंबेगाव येथे 45 मिमी, खडकवासला येथे 21 मिमी, वारजे येथे 19.6 मिमी, कोथरूड येथे 13 मिमी, एमआयटी लोणीकाळभोर येथे 10.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे