पुणे – उन्हाचा चटका, ढगाळ वातावरण तर रात्री थंडी आणि पहाटे धुके असा बदललेल्या हवामानामुळे शहरात सर्दी, ताप, खोकला, कफाच्या त्रासाने पुणेकर हैराण झाले आहे. त्यात डेंग्यूनेही डोके वर काढले असून, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाळा संपला आणि “ऑक्टोबर हिट’ सुरू झाली. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे असलेल्या रूग्णांची संख्या वाढू लागली. त्यात ऑक्टोबर अखेर शहरातील किमान तापमानात घट झाली.
परिणामी, पहाटे दुपारचा उन्हाचा चटका आणि त्यानंतर ढगाळ वातावरण झाले. तर किमान तापमान 14 अंशापर्यंत खाली आल्यामुळे मागील दहा दिवसांपासून रात्री थंडी आणि पहाटे धुके अशा ऋतूचा अनुभव घेताना पुणेकर मार्ग नाकाला हात लावून बसले. यासोबतच काही रुग्णांना कफाची समस्या अधिक वाढू लागली.
दरम्यान, “सध्या वातावरणामुळे तापाचे रुग्ण वाढले आहेत. साधरणतः तीन दिवसांपर्यंत ताप राहतो. त्यानंतर चार ते पाच दिवस सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. काही रुग्णांना तापानंतर दहा दिवसांपर्यंत सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे,’ असे फॅमिली फिजिशियन डॉ. सोनाली घोणे यांनी सांगितले.
“मागील महिनाभरात बदलेल्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक त्रास लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना अधिक होत असल्याचे दिसून आले आहे.” – डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, मनपा