नगर – शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ फुटल्याने रविवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, रेल्वे स्टेशन परिसरात आज (सोमवारी) पाणी सोडण्यात येणार आहे. तर, बुरुडगाव रोड, सारसनगर, विनायक नगर भागास मंगळवारी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती अभियंता गणेश गाडळकर यांनी दिली.
रविवारी सकाळच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने या जलवाहिनीवरून स्टेशन रस्ता परिसरात रविवारी नियोजित असलेला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेने जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. जल अभियंता परिमल निकम, अभियंता गाडळकर दुरुस्तीच्या ठिकाणी तळ ठोकून होते.
सोमवारी पहाटेच्या सुमारास जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, आज नियोजित पाणीपुरवठा असलेल्या सारसनगर, बुरुडगाव रोड, विनायक नगर भागात मंगळवारी पाणी सोडण्यात येणार असल्याचे गाडळकर यांनी सांगितले.