पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी एक हजार पदांसाठी 74 हजार 507 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्याचप्रमाणे या ऑनलाइन अर्जातून जिल्हा परिषदेला यातून 6 कोटी 66 लाख 52 हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे जिल्हा परिषदेत गट क सवंर्गातील 21 पदांच्या सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज प्रक्रियेतून जिल्हा परिषदेला यातून 6 कोटी 66 लाख 52 हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली.
भरतीप्रक्रिया “आयबीपीएस’ या खासगी यंत्रणेद्वारे होत आहे. अर्ज करण्यासाठी 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, अशी मुदत देण्यात आली होती. सर्वाधिक अर्ज आरोग्य सेवक (पुरूष) पदासाठी आले आहेत. या पदासाठी 124 जागा असून, त्यासाठी 28 हजार 209 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
सर्वाधिक जागा असलेल्या आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला) पदासाठी 436 जागा असून त्यासाठी 3 हजार 930 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 37 जागांसाठी 4 हजार 575 उमेदवारांनी, आरोग्य सेवक (पुरूष, हंगामी फवारणी) पदाच्या 128 जागांसाठी 2 हजार 898 अर्ज आले आहेत.
औषध निर्माण अधिकारी पदासाठी 25 जागांसाठी 5 हजार 573, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या चार जागांसाठी 1 हजार 405 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. जिल्हा परिषदेच्या या विविध पदांसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेला अर्ज प्रक्रियेतून प्राप्त झालेले पैसे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कंपनीला देण्यात येणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.