नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनानिमित्त घोषित करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार 2024 साठी नामांकन किंवा शिफारसी 15 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची सुचना केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारच्या पोर्टलवर गेल्या 1 मे पासून या विषयीच्या शिफारशी स्वीकारल्या जात आहेत.
पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य,
विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, उद्योग, व्यापार यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये आणि शाखांमध्ये विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. सरकारी सेवेतील कर्मचारी मात्र या पुरस्कारासाठी पात्र नाहीत.