पुणे – महापालिकेकडून शहरातील दहावी आणि बारावीच्या गुणवंतांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अखेर महापालिका प्रशासनाला वेळ मिळाला असून या शिष्यवृत्तीसाठी येत्या 9 ऑक्टोबर (गुरुवार) पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून देण्यात आली.
अकरावीच्या प्रवेश फेऱ्या सुरू असल्याने तसेच 12 वी नंतरची प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरूच असल्याने प्रशासनाने अद्याप अर्ज मागिवले नव्हते. दरम्यान, महापालिकेकडून अर्ज मागविण्यास उशीर झाल्याने ही शिष्यवृत्ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाकडील योजनेअंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाश्यांच्या पाल्यांना दरवर्षी मौलाना अबूल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत 15 हजार रूपये तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत 25 हजार रुपयांची मदत केली जाते. मुलांना पुढील शिक्षणासाठी ही मदत उपयुक्त ठरते. त्यासाठी, अर्ज भरताना महापालिकेने निश्चित करून दिलेली कागदपत्रे आणि पुढील वर्षाचे प्रवेश घेतल्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर ही शिष्यवृत्ती थेट मुलांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते.
आचारसंहितेचा बसणार फटका
महापालिका प्रशासनाकडून अर्ज मागविण्यात आले असले तरी त्याला एक ते दीड महिन्याची मुदत दिली जाणार आहे. त्यामुळे, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अर्जांची तपासणी करून लगेच पैसे देण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र, डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महापालिकेस विद्यार्थ्यांना पैसे देता येतील का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
या योजनेसाठी अटी…
- अर्जदार विद्यार्थी महापालिका हद्दीतील रहिवासी असावा.
- खुल्या गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात दहावी किंवा 12 वीमध्ये 80 टक्के गुण असावेत.
- विद्यार्थी महापालिका शाळा, रात्रशाळा अथवा मागासवर्गीय गटातील असल्यास दहावी-12 वीमध्ये 70 टक्के गुण आवश्यक आहेत.
- अर्जदार विद्यार्थी 40 टक्के अपंग असल्यास दहावी, बारावीमध्ये किमान 65 टक्के गुण आवश्यक.
- अर्जदाराने शिक्षणासाठी पुढील वर्षात शैक्षणिक संस्था अथवा महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.