वार्षिक सुट्टीच्या यादीत एकादशीचा समावेशच नाही
मांडवगण फराटा – पुणे जिल्हा परिषदेचा आणखी एक भोंगळ कारभार आता समोर आला आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पाठवलेल्या वार्षिक सुट्टीच्या यादीत आषाढी एकादशीचा समावेश नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरवर्षी जिल्हा परिषद शाळांना आषाढी एकादशीची सुट्टी असते. परंतु यावर्षी जिल्हा परिषदेने पाठवलेल्या यादीत (दि.28) जून ही बकरी ईदची सुट्टी असा उल्लेख केला आहे. मात्र, 29 जून या तारखेला असलेल्या आषाढी एकादशीची सुट्टीचा मात्र समावेश केलेला नाही. यावर्षी आषाढी एकादशीची सुट्टी नसल्याने शालेय विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
आषाढी एकादशी हा हिंदू पंचांगातील वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. परंतु पुणे जिल्हा परिषदेला मात्र या उत्सवाचा म्हणजेच आषाढी एकादशीचा विसर पडलेला दिसत आहे.
विशेष म्हणजे मुस्लीम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आणि आषाढी एकादशी या वर्षी एकाच दिवशी म्हणजे 29 तारखेला आले आहेत. जिल्हा परिषदेच्या या परिपत्रकावर शैक्षणिक खात्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
शेकडो वर्षांपासून पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा संत परंपरेचा आणि उभ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल- रखुमाईचा विसर पडणे हे खूप दुर्दैवी आहे. जिल्हा परिषदेने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
ऍड. वैभव बोत्रे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती पारगाव.
राज्यात आषाढी एकादशीचा उत्सव अनेक वर्षांपासून साजरा केला जातो. दरवर्षी आषाढीला शासकीय सुट्टी जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात येते. यंदा जिल्हा परिषदेने शासकीय सुट्ट्यांमध्ये आषाढीचा समावेश न केल्याने जिल्हा परिषदेच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो.
– गणेश फराटे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन, मांडवगण फराटा.