रामवाडी : विरूद्ध दिशने वाहनचालक अगदी सरार्स वाहने चालवित आहेत.
येरवडा – पुणे-नगर महामार्गावर रामवाडीमध्ये आयबीस हॉटेल समोर बीआरटीच्या दुभाजकाला धडकून केमिकलचा टॅंकर उलटाल होता. त्यानंतर या रस्त्यावरील दुभाजकांना धडकुन आठवड्याभरात छोट्या-मोठ्या वाहनांचे तीन अपघात झाले आहेत. पुणे-नगर रस्त्यावर बीआरटी मार्ग चुकीचा केल्याने रामवाडीकरांना नरकयातना भोगत आहेत.
पुणे-नगर रस्त्यावर स.नं. २९, रामवाडी नगर रोड, पुणे १४ येथील नागरिकांना रामवाडीच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर वाहन चालकांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग खुला होता. परंतु, नगररोड बीआरटी मार्गामुळे रामवाडीतील वाहन चालकांचे रस्ता ओलांडणे बंद झाले आहे.
रामवाडी भागात लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय, सुभेदार रामोजी मालोजी आंबेडकर माध्यमिक विद्यालय, नगररोड क्षेत्रिय कार्यालय, रामवाडी पोलीस चौकी, बँका व अनेक दवाखाने आहेत.
रामवाडी मधील नागरिकांना वाहने घेवून विमाननगर, चंदननगर, वडगांवशेरी, खराडी, वाघोली आदी भागात जाण्यासाठी सध्या विरूध्द दिशेने शिवपूत्र धर्मवीर संभाजी महाराज चौकातून (रामवाडी पंपिंग स्टेशन) जावे लागते. बीआरटी मार्गामुळे रामवाडीतील नागरिकांना आपले वाहने घेवून जाण्यासाठी अंदाजे ४ कि.मी. फिरून यावे लागते, त्यामुळे वाहन चालक हे शिवपूत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात (रामवाडी पंपिंग स्टेशन) वाहनचालकांना इच्छा नसतानाही वेळ, इंधन वाचविण्यासाठी विरूध्द दिशेने जावे लागते. वाहन चालक विरूध्द दिशेने येत असल्यामुळे या रस्त्यावर किरकोळ अपघात होत आहेत.
अनेक वेळा वातहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी वाद-विवाद होत आहेत. अर्धवट असलेला बीआरटी मार्ग, तुटलेले दुभाजक, रिफ्लेक्टर नसलेले अनेक भागात पथदिवे बंद असल्याने हे अपघात होत असुनही महापालिका पथविभागाचे अधिकारी तसेच पीएमपीएल बीआरटीचे व्यवस्थापन पाहणारे अधिकारी हातावर हात धरुन बसले आहेत. या अपघातामुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे कोणाचेही लक्षच नसल्याचे दिसते.
“अर्धवट बीआरटी मार्गामुळे अनेक अपघात होत आहेत. सततची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेकडे अनेक वेळा मागणी करुनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.” – प्रमोद मोहन देवकर-पाटील, अध्यक्ष, कर्तव्य जनमंच