पिंपरी – इंद्रायणी नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन-2023’ मध्ये तब्बल 30 हजार 370 हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी ‘ इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ चे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. यंदाच्या सायकल रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.
आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित न करता स्वच्छ ठेवावी” हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड नगरपालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस विभाग आणि इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढाकार घेतला.
यावेळी ‘ रिव्हर सायक्लोथॉन टीम’ ने ‘लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. त्याचे प्रमाणपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, कुस्तीपटू नरसिंह यादव यांच्यासह महापालिका, पोलीस अधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी अविरत श्रमदान आणि सायकल मित्र संघटनेच्या पुढाकाराने ‘रिव्हर सायक्लोथॉन’चे आयोजित करण्यात येते. जर्मनीचे रेकॉर्ड तोडण्यासाठी 60 देशांनी प्रयत्न केले. मात्र, भारताने हे रेकॉर्ड मोडले. या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण आणि फिटनेसचा संदेश देण्यात येत आहे. या रॅलीला ऐतिहासिक प्रतिसाद दिला. याबद्दल सायकलपटू आणि पर्यावरण प्रेमींचे आभार.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा,