लस आहे का संपली? एका क्‍लिकवर एक दिवस आधीच समजणार

मराठा चेंबरचेही उपक्रमात सहकार्य नागरिकांची गैरसोय टळणार

पुणे – शहरातील लसीकरणाचा गोंधळ कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून लसीकरण केंद्रांची माहिती आता पुणेकरांना एका क्‍लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 यासाठीचा डॅशबोर्ड पुणे महापालिका आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या डॅशबोर्डचे लोकार्पण करण्यात आले.

या डॅशबोर्ड शहरातील लसीकरण केंद्राची माहिती पुणेकरांना एक दिवस आधीच मिळणार असल्याने नागरिकांची लसीकरणाबाबत होणारी गैरसोय टळण्यास मदत होणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले. महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सुनीता वाडेकर, विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ, अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल यावेळी उपस्थित होत्या.

शहरात 16 जानेवारीपासून लसीकरण टप्प्या टप्प्याने सुरू झाले आहे. तर 1 मे पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, या लसीकरणासाठी होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यातच, महापालिकेस शासनाकडून होणारा लसींचा पुरवठा नियमित होत नसल्याने लसीकरण कधी होणार आणि कधी नाही हे कोणालाही माहित नसते.

त्यामुळे शहरातील लसीकरणाचा गोंधळ उडाला असून अनेक केंद्रावर पहाटेपासून नागरिक लसीकरणासाठी रांगा लावत आहेत, त्याततच केंद्रावर किती लस उपलब्ध आहेत त्यानुसार, लसीकरण होत असल्याने अचानक वाढलेल्या गर्दीने गोंधळ निर्माण होत आहे.

 

ही बाब लक्षात घेऊन पालिकेकडून त्यावर तोडगा काढण्यासाठी ऑनलाई डॅशबोर्ड (https://www.punevaccination.in/ ) तयार केला आहे. यासाठी शॉपटीमाईज आणि सीपीसी ऍनलॅटिक्‍स या संस्थानीही सीएसआर अंतर्गत मदत केली आहे.

एका क्‍लिकवर लसीकरण केंद्राची माहिती…
या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या लोकेशननुसार त्यांच्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळणार आहे, लसीकरण केंद्र , केंद्रावर असलेली लस, डोसची संख्या इत्यादी, माहिती नागरिकांना समजावी या उद्देशाने ऑनलाई डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. दररोज संध्याकाळी, लसीकरण केंद्रांसाठी (दुसऱ्या दिवसासाठी) डेटा गोळा केला जाईल आणि या ऑनलाइन डॅशबोर्डवर अपलोड केला जाईल.

त्यामुळे या डॅशबोर्डवर क्‍लिक केल्यावर त्यांनी वयोगट, लसीचा प्रकार (कोव्हॅक्‍सीन, कोव्हीशिल्ड) डोसचा प्रकार (पहिला व दुसरा), लसीकरण केंद्र (सरकारी, खासगी) असे पर्याय दिसतील, त्यानंतर संबंधित व्यक्‍तीला शहरातील सर्व लसीकरण केंद्राची माहती लोकेशनसह उपलब्ध होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.