पुणे – महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेला भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासंदर्भात महापालिकेकडे आलेल्यांपैकी सातही आराखड्यांचे सादरीकरण राज्य शासनाकडे दि. ९ जानेवारी रोजी करण्यात आले. त्यानंतर अद्यापही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन शासन हा निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या बैठकीत महापालिकेने हे सादरीकरण केले होते. या आराखड्यात सुधारणा सुचवण्याचे महापालिकेस सांगण्यात आले असले, तरी शासनाने महापालिकेस अद्याप काहीच कळवलेले नाही. परिणामी, स्मारकाचा विषय आता शासनाकडे रखडला आहे.
या वाड्याची जागा मिळविण्यासाठी महापालिकेने तेरा वर्षांत उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. त्यानंतर महापालिकेने हा लढा जिंकत स्मारकाची जागा ताब्यात मिळविली. ही जागा लहान असल्याने महापालिकेने त्यानुसार स्मारक कसे असावे, यासाठी प्रस्ताव मागविले. त्यात सात प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यातच आता नेत्यांकडून स्मारकामध्ये कायकाय असावे याच्या सूचना दिल्या जात आहेत.
त्यामुळे जागा कमी असल्याने स्मारकासाठी येणारी वाहने तसेच गर्दी लक्षात घेऊन महापालिकेस बहुमजली स्मारक बांधावे लागणार आहे. त्यावरून एकमत होत नसल्याने स्मारकाच्या आराखड्यात बदल करण्यास सांगण्यात येत असले, तरी त्याबाबत शासनाकडून स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे हे कामकाज थंडावले आहे.