पुणे – राज्यातील खेळाडू तसेच नागरिकांना सराव करण्यासाठी क्रीडा विभागाकडून संकुले उभारण्यात आली आहेत. मात्र, दैनंदिन देखभाल तसेच दुरुस्तीसाठी निधी नसल्याने या क्रीडा संकुलांची दुरवस्था झाली आहे. त्यातच किती निधी द्यावा, याबाबत शासनाचे धोरण नाही. त्यामुळे खर्च करण्यात स्थानिक पातळीवर अडचणी येत होत्या. अखेर शासनाने त्यासाठी धोरण तयार केले असून, देखभाल व दुरुस्तीसाठी २ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे.
यामध्ये विभागीय क्रीडा संकुलासाठी पहिल्या वर्षी १५ लाख रुपये, दुसर्या वर्षी १२ लाख ५० हजार रुपये, तिसर्या वर्षासाठी १० लाख रुपये, जिल्हा क्रीडा संकुलांसाठी प्रथम वर्षासाठी १० लाख रुपये, दुसर्या वर्षी ७ लाख ५० हजार रुपये, तिसर्या वर्षासाठी ५ लाख रुपये, तालुका क्रीडा संकुलासाठी पहिल्या वर्षी ३ लाख रुपये निधी मिळणार आहे.
तसेच क्रीडा संकुलास मिळणारे उत्पन्न आणि प्रत्यक्षात येणारा खर्च यातील तफावतीच्या रकमेचे हे अनुदान असणार आहे. करोना काळात क्रीडा संकुलांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली होती. त्यामुळे राज्यभरातील क्रीडा संघटना तसेच खेळाडूंकडून शासनाने तातडने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत होती.