पुणे : सुस गावात पुरेसा पाणी पुरवठा होत नसलेल्या भागात नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. सुस भागात नागरी समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेवक बालवडकर गेले असताना गावातील काही महिलांनी त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर बालवडकर यांनी अवघ्या 12 तासांच्या आत या टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे बालवडकर यांनी सांगितले. गणपती मंदीर परिसर, पारखे वस्ती, शेख कॉलेज परिसरात दहा ठिकाणी या पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. या पाण्याचे जलपूजन नुकतेच या भागातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. सुसच्या माजी उपसरपंच दिशा ससार, अनिल ससार, शशिकांत बालवड यांच्यासह अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
बालवडकर म्हणाले की, सुस गावातील सहकारी नारायण चांदेरे आणि अनिल ससार यांच्यासह गावातील समस्या जाणून घेण्यासाठी गेलो असता या भागातील अनेक महिलांनी पाण्याची समस्या मांडली. पाणी आणण्यासाठी बाणेर पर्यंतच जावे लागते. काही जण पायपीट करतात तर काही जण मोटार सायकलवर पाण्याचे 20 लीटर क्षमतेचे ड्रम घेऊन पाणी आणावे लागते. अनेकदा वाहतूकीच्या वर्दळीत जीव मुठीत घेऊन अपघातांचा सामना करत पाणी आणावे लागत असल्याच्या तक्रारी महिलांनी मांडल्या. त्यानंतर या महिलांच्या तक्रारीची दखल घेत तातडीनं या भागात पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या असून महिला वर्गाकडून त्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे. तसेच सुस आणि म्हाळूंगेसाठी स्वखर्चातून पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून दिले असून महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होई पर्यंत हे काम सातत्याने सुरूच ठेवणार असल्याचे बालवडकर यांनी स्पष्ट केले.