मुंबई – नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शनाचा उपक्रम काल झाला. प्रदर्शनात 50 स्टार्टअप्ससह साधारण 70 हून अधिक गुंतवणुकदारांनी सहभाग घेतला. तरुणांनी शोधलेल्या विविध स्टार्टअप्सच्या नवनवीन संकल्पनांची गुंतवणूकदारांनी पाहणी केली व त्यामध्ये गुंतवणुकीत स्वारस्य दाखविले. तरुणांमधील संशोधन, नवसंकल्पना यांना चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
स्टार्टअप सप्ताहातून पुढे आलेल्या संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांना 15 लाख रुपयांची शासकीय कामे देण्यात येत आहेत. नविन संकल्पनांना पेटंट मिळविण्यासाठी 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या क्षेत्राला अजून पाठबळ देण्यासाठी बीकेसी येथे जागतिक दर्जाचे इनक्युबेशन सेंटर चालू करण्यात येईल. स्टार्टअप्सना ग्रामीण, तालुका, जिल्हा पातळीवरही प्रोत्साहन देण्यात येईल. महिला उद्योजकतेला चालनेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्टार्टअप्स व गुंतवणूकदारांना जोडून स्टार्टअप्सना त्यांच्या कल्पनांचे मोठ्या उद्योगात रूपांतर करण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.