पुणे -उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना रविवारी वादळी पावसाने धुतले. ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी पाच वाजल्यापासून मध्यवर्ती पेठांसह उपनगरांत जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. धायरी-नऱ्हे भागांत गारपीट झाली. तर तब्बल 31 ठिकाणी झाडपडी झाल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान, सोमवारीदेखील पुण्यासह राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
रविवारी दुपारपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास अंधार दाटून आला होता. काही वेळातच ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे दुचाकी चालक आणि नागरिकांची धांदल उडाली. शहरातील काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. पेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची या पावसामुळे धांदल उडाली. तर, कात्रज-आंबेगाव परिसरात काही वेळातच रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. रविवारी शहरात किमान 19.7, तर कमाल
37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, भवानी पेठ परिसरात एक मोठे होर्डिंग कोसळण्याच्या स्थितीत असताना अग्निशमन दलाने ते दूर केल्याने मोठा अनर्थ टळला
31 ठिकाणी झाडपडी
शहरात रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. शहरात विविध 31 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. यात जीवितहानी झाली नसली तरी काही वाहनांचे नुकसान झाले आहे. सिंहगड रस्त्यावर पाच ते सहा ठिकाणी झाडपडी झाली. त्यात भाजीपाला वाहतुकीच्या टेम्पोचे नुकसान झाले, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.