पुणे -पुण्यातील पिंपरी चिंचवडसह इतर अनेक प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) कार्यालयांत पक्क्या लायसन्ससाठी लागणाऱ्या स्मार्ट कार्डचा सध्या तुटवडा असून, नागरीकांना महीनोंमहिने लायसन्स मिळविण्यासाठी वेटींग करावी लागत आहे. तसेच आरटीओ कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिवहन विभागाने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पक्के लायसन्ससाठी लागणाऱ्या स्मार्ट कार्डसाठी परिवहन विभागाने दोन कंपन्यांना स्मार्ट कार्ड पुरवण्याचे कंत्राट दिले आहेत. त्यापैकी युटीएल नावाच्या एका कंपनीकडून स्मार्ट कार्डचा अपुरा पुरवठा असल्याने राज्यभरात ही समस्या निर्माण झाली आहे. स्मार्ट कार्ड बनविताना त्यामध्ये एक चीप असते. ही चीप उपलब्ध होण्यास अडचणी असल्याने अनेक ठिकाणी लायसन्सचा कारभार ठप्प झाला आहे. पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात फेब्रुवारी महिन्यापासून पक्के लायसनन्स उपलब्ध होऊ शकले नाहीत. परिणामी जवळपास 24 हजार नागरीकांचे लायसन्स प्रलंबित आहेत. राज्यात युटीएल कंपनीकडून पुरवठा होणाऱ्या बहुतांश कार्यालयात हीच परिस्थिती आहे.
अशी आहे प्रक्रिया
आरटीओकडून नागरीकांना घरबसल्या देण्यात येणाऱ्या ऑनलाइन सेवेमुळे अनेक नागरीक सध्या घरबसल्या शिकाऊ लायसन्स काढतात. शिकाऊ लायसन्सची वैधता 6 महिन्यांची असल्यामुळे 6 महिन्याच्या आतमध्ये नागरीकांना पक्के लायसन्स मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर त्यांना अपॉइंटमेंट घेवून पक्क्या लायसन्ससाठी परीक्षा द्यावी लागते. परीक्षा दिल्यानंतर 15 दिवसात पक्के लायसन्स पोस्टाने घरी येणे अपेक्षित आहे.