पुणे – जिल्हा प्रशासनाकडून अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली असली तरी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरूच राहणार आहे. पात्र मतदारांनी यादीत आपले नाव नसल्यास नमुना क्र.६ चा अर्ज ऑनलाइन किंवा जवळच्या मतदान केंद्रावर भरावा. मतदार यादीतील नावे तपासण्यासाठी वोटर हेल्पलाईन अॅप किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्याची अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमदध्ये जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीच्या तुलनेत १८-४९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार २९९ मतदार वाढले, तर ५० वर्षावरील मतदारांच्या संख्येत ८७ हजार ४६३ एवढी घट झाली आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत तृतीयपंथी मतदारांची संख्या ६९५ ने वाढली आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणे, लोकसंख्यनुसार विशिष्ट वयोगटातील लोकसंख्येनुसार मतदार नोंदणी करून घेणे आणि वगळण्याबाबत नियोजन, समाजातील भटक्या व विमुक्त जाती, महिला, तृतीयपंथी व्यक्ती व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदणीवर भर, मतदार यादी शुध्दीकरणाच्या अनुषंगाने मयत, दुबार स्थलांतरित मतदारांची पडताळणी योग्यरित्या करण्यासाठी मोहीम स्तरावर काम केल्याने अपेक्षित कामगिरी करणे शक्य झाले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी सांगितले.
५० हजारांवर दुबार मतदारांची नावे वगळली
मतदार यादी शुद्धीकरणाच्या अनुषंगाने समान छायाचित्रे असलेली व दुबार नावे असलेली ५० हजारावर नावे वगळण्यात आली आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मतदार नोंदणी अधिकारी यांनी दैनदिन आढाव्यात त्रुटी व अडचणींचे निराकारण करून आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करून समान छायाचित्रे असलेली ४० हजार ३९० आणि १० हजार २०४ दुबार नावे वगळली आहेत