पुणे, दि. 23 -राज्यातील मुदत संपलेल्या तसेच मुदत संपत आलेल्या 24 महापालिकांच्या रखडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचनो करण्याचे आदेश राज्यातील 24 महापालिका आयुक्त आणि प्रशासकांना नगरविकास विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाकडूनही प्रभाग रचना पूर्णत: नव्याने करण्यात येणार असून ही प्रभाग रचना नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांसह असणार आहे. त्यामुळे, 2002 च्या महापालिका निवडणूकी प्रमाणे ही गावे वगळून जुन्या हद्दीसाठी निवडणूक होण्याच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
यापूर्वी निवडणूक आयोगाने तीन सदस्य संख्येनुसार प्रभाग रचना करताना महापालिकेस 2011 च्या जनगणनेनुसार 35 लाख 56 हजार लोकसंख्या निश्चित करून दिली आहे. यात 34 गावांच्या लोकसंख्येचाही समावेश आहे. त्यामुळे प्रभाग रचना तीन किंवा चारची होणार याबाबत संभ्रम असला तरी तूर्तास महापालिकेस ही गावेही प्रभाग रचनेत घ्यावी लागणार असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र त्याचवेळी गावे वाढल्याने महाविकास आघाडी सरकारने पालिकेसाठीची सदस्य संख्या 173 केली होती. ही संख्या राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने कमी केल्याने शहरात पुन्हा 166 नगरसेवकच असणार असल्याने या गावांना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे.
…तर सदस्य संख्या वाढली असती
महापालिकेत नवीन गावे समाविष्ट झाल्याने तसेच 2021 ची जनगणना न झाल्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने गावांना प्रतिनिधीत्त्व देण्यासाठी सदस्य संख्येच्या अधिनियमात बदल करत तीन सदस्य प्रभाग रचना करताना पहिल्या 30 लाख लोकसंख्येसाठी कमीत कमी 168 आणि त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक अशी सदस्य संख्या निश्चित केली होती. त्यामुळे पुण्यात 173 नगरसेवक होणार असल्याचे निश्चित झाले होते. तीननुसार 58 प्रभागही तयार करण्यात आले. त्यामुळे महापालिकेची 2017 मध्ये असलेली 162 ची सदस्य संख्या 173 वर गेल्याने नव्याने समाविष्ट गावांसाठी 11 सदस्य वाढणार होते.
प्रभागांचा आकार फुगणार
महापालिकेत नवीन गावांच्या समावेशापूर्वी पालिकेची हद्द 253 चौरस किलोमीटर होती. मात्र 34 गावांच्या समावेशानंतर ती तब्बल 518 चौरस मीटर झाली आहे. प्रभाग रचना तीन सदस्यांची झाल्यास 54 प्रभाग तीन सदस्यांचे तर एक प्रभाग 4 सदस्यांचा असून शकतो. तर चार सदस्यांचा प्रभाग झाल्यास चार सदस्यांचे 40, तर तीन सदस्यांचे दोन प्रभाग होतील. तर प्रभागात कमीत कमी 77 ते 80 हजार आणि जास्तीत जास्त 95 हजार ते एक लाखापर्यंत मतदार असणार असू शकतील.
गावकारभाऱ्यांचे स्वप्न भंगणार
राज्यात सत्ताबदल होताच, शिंदे-फडणवीस सरकारकडून पुन्हा महाविकास आघाडीचा निर्णय बदलत 30 लाखांसाठी 161 आणि त्यापुढे प्रत्येक लाखासाठी एक सदस्य संख्या करण्यात आली. त्यामुळे आता 2011 च्या जनगणनेनुसार पुण्यात एकूण 166 नगरसेवक असणार आहेत. तर 2017 पेक्षा अवघे 4 नगरसेवक वाढणार असल्याने समाविष्ट 34 गावांचे प्रतिनिधीत्व आपोआपच घटणार असून, गावांसाठी राजकीयदृष्टया ही बाब अन्यायकारक ठरणार आहे.
अशी असेल संभाव्य प्रभाग रचना
चार सदस्यांचा प्रभाग झाल्यास…
एकूण सदस्य संख्या166
एकूण प्रभाग42
चार सदस्यांचे प्रभाग40
तीन सदस्यांचे प्रभाग2
तीन सदस्यांचा प्रभाग झाल्यास…
एकूण जागा166
एकूण प्रभाग55
तीन सदस्यांचे54
चार सदस्यांचा1
असे असेल आरक्षणाचे संभाव्य चित्र
एकूण सदस्य संख्या – 166
महिलांसाठी एकूण जागापैकी 50 टक्के राखीव – 83 जागा
अनुसूचित जाती राखीव – 22 जागा ( 11 जागा महिलांसाठी)
अनुसूचित जमातींसाठी राखीव – 2 जागा ( 1 जागा महिलेसाठी)
इतर मागासवर्गीय राखीव – 44 जागा ( 22 जागा महिलांसाठी)
खुल्या गटासाठी राखीव – 98 जागा ( 49 महिलांसाठी राखीव)