हिंजवडीतील प्रकार ः दालनाची अदला-बदली केल्याने बसावे लागले हॉलमध्ये
हिंजवडी – दिवाळीच्या सुटीनंतर शासकीय कार्यालयात गर्दी होत आहे मात्र आयटीनगरी हिंजवडी ग्रामपंचायतचा कारभार सोमवारी (दि.20) नागरिकांना अनुभवयास मिळाला. सरपंच गणेश जांभुळकर आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या सोमा खैरे यांच्या दालनास दिवसभर टाळे होते.
काही दिवसांपासून ग्रामविकास अधिकारी खैरे वैद्यकीय रजेवर होते. दरम्यानच्या काळात त्यांचे केबिन बदलून सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या केबिनच्या अदला-बदली करण्यात आली.
सोमवारी ते रुजू होताच आपले दालन “लॉक’ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने, नागरिकांची गैरसोय टाळण्यायासाठी त्यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये बसून कामास सुरुवात केली. दुपारनंतर ते गावातील प्रलंबित कामे पाहण्यासाठी निघून गेले.
दरम्यान, या प्रकारावर यावर विरोधी गटाचे सदस्य मयूर साखरे म्हणाले, “गावच्या विकासाचे घेणे- देणे नसलेल्या पदाधिकाऱ्यांना व कथित नेत्यांना मर्जीतील अधिकारी हवे आहेत. दर तीन महिन्यांनी सरपंच बदलतात. तसे प्रत्येकाच्या मर्जीनुसार वागणारे अधिकारी त्यांना हवे आहेत. यात सुधारणा न झाल्यास अनागोंदी कारभाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहोत, असे सदस्य साखरे यांनी सांगितले.
हिंजवडीत ग्रामविकास अधिकारी खैरे रुजू झाले असून असा काही प्रकार असेल तर विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठविण्यात येईल. टाळे लावण्याचा असा काही प्रकार असेल, तर चौकशीनंतर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला जाईल.
– संजय ढमाळ, प्रभारी गटविकास अधिकारी.