पुणे – जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे बारा हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, तांदूळ, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. तर, १९ हजार शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतांमधील उभ्या पिकांनाही मोठा तडाखा दिला आहे. तांदूळ, ज्वारी, कांदा, बटाटा, मका, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, फळबागांचेही जबर नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक 4 हजार 817 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली असून, सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
त्यानंतर शिरूर तालुक्यात 2 हजार 824 हेक्टर क्षेत्रावरील पिके जमीनदोस्त झाली असून, 6 हजार 130 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आंबेगाव तालुक्यात सुमारे 2 हजार 612 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना तडाखा बसला असून, 6 हजार 428 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.