पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ललित कला केंद्राच्या हाकेच्या अंतरावर विद्यापीठाचा सुरक्षा विभाग आहे. विद्यापीठालगतच चतु:शृंगी पोलीस स्टेशन आहे. स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असतानाही विद्यापीठात हाणामारीचा प्रकार कसे काय घडतात? असा प्रश्न आहे. तीन महिन्यांपूर्वी सभासद नोंदणीवरुन दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. पुन्हा तसाच प्रकार आता झाला आहे.
एकूणच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरुन विद्यापीठाची हतबलता स्पष्टपणे दिसून येत आहे. ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या नाट्य सादरीकरणावरुन तिसऱ्या दिवशीही विद्यापीठात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जब वी मेट या नाटकावरुन तोडफोड आणि हाणामारीच्या प्रकाराने विद्यापीठ गेल्या तीन दिवसांत चर्चेत आहे.
याप्रकरणी ललित कला केंद्राच्या विभागप्रमुखांसह सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यापीठाकडून दाखल केलेल्या तक्रारीवरुन युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारांनंतर विद्यापीठातील वातावरण तणावपूर्ण अवस्थेत आहे.
देशातील महत्त्वाच्या घटनेचे पडसाद पुणे विद्यापीठात उमटतात. एखाद्या निर्णयावरुन वाद-विवाद होतात आणि वैचारिक मतभिन्नताही विद्यापीठातून प्रकर्षाने दिसून येते. यापूर्वी विद्यापीठात विविध उपक्रम अथवा कार्यक्रमांतून ही बाब अधोरेखित होत होती. आंदोलने होत होती. मात्र, आता वैचारिक पातळीवर व ठोस विषयांवर होणारे वादाचे स्वरुप तोडफोड, हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यात विद्यापीठ प्रशासन हतबल ठरले आहे.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणानंतर प्रथमच विद्यापीठ आवारात १४४ कलम लागू करण्यात आले होते. तसेच आंदोलन अथवा कार्यक्रमांसाठी विद्यार्थी संघटनांनाही नियमावलीही प्रसिद्ध करण्यात आली. ती नियमावलीही विद्यापीठाने मागे घेतली. त्यामुळे अशा प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुलगुरुंनीच ठोस पाऊले उचलणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.
अभिनेते प्रवीण तरडे समितीचे सदस्य
याप्रकरणी विद्यापीठाने नेमलेली चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे हे काम पाहणार आहेत. समितीमध्ये अभिनेता प्रवीण तरडे, प्राचार्य डाॅ. देवीदास वायदंडे, अधिसभा सदस्य विनायक आंबेकर, डाॅ. ज्योती भाकरे, प्राचार्य डाॅ. क्रांती देशमुख या सदस्य, तर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे यांचा समावेश आहे.