पुणे – जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीचे रॅंकिंग जाहीर करण्यात आले असून, यात आयआयटी मुंबईने जगातील पहिल्या 150 संस्थांमध्ये स्थान मिळवण्याची कामगिरी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विद्यापीठाचे स्थान उंचावले असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घसरण झाली आहे.
ब्रिटनस्थित मानांकन संस्था “क्यूएस’कडून दरवर्षी जगभरातील विद्यापीठांची क्रमवारी जाहीर होत असते. शैक्षणिक प्रतिष्ठा, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय शिक्षक, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय संशोधन, शाश्वतता अशा निकषांवर मूल्यमापन करण्यात येते. या क्रमवारीत जगातील पहिल्या पाचशे संस्थांमध्ये देशभरातील 45 विद्यापीठांचा समावेश आहे. यंदा पहिल्या 200 मध्ये दोन, 300 मध्ये सहा, 500 च्या यादीत 11 विद्यापीठे आहेत.
क्रमवारीत अमेरिकेतील “एमआयटी’ ही संस्था पहिल्या क्रमांकावर आहे. सन 2012 पासून एमआयटीने पहिल्या क्रमांकावरील स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ केंब्रिज विद्यापीठ दुसऱ्या आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे. क्रमवारीमध्ये आशियातील चीन आणि जपाननंतर भारतातील विद्यापीठांचा समावेश आहे.गेल्या वर्षीच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 541 ते 550 या गटात समावेश होता. 2024 साठीच्या क्रमवारीत विद्यापीठाची मोठी घसरण होऊन पुणे विद्यापीठ 711 ते 720 या गटात आले आहे. पुणे विद्यापीठ देशात 16 व्या क्रमांकावर आहे. 200 ने पुणे विद्यापीठाचा रॅंक कमी झाला आहे.