पायाभूत कामांमुळे आणखी 12 ट्रेन्सचा वेग 130 किमी प्रतितास
पुणे – मध्य रेल्वेअंतर्गत गेल्या काही काळात पायाभूत कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शनमध्ये गेल्या काही दिवसांत तब्बल 12 ट्रेन्सचा वेग 130 किमी प्रतितास राहिला आहे. त्यामुळे वेळेची बचत होत आहे.
याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांत ट्रेन्सचा वेग वाढवण्यासाठी मल्टिट्रॅकिंग (एका विभागात अनेक ट्रॅक टाकणे), ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे हा वेग गाठणे शक्य झाले आहे. सध्या इगतपुरी-भुसावळ (308.12 किमी) आणि भुसावळ-बडनेरा (218.53 किमी) मार्गावर ट्रेन्स सुसाट धावत आहेत.
मध्य रेल्वे सध्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शनवर 526.65 किमी, पुणे-दौंड सेक्शनवर 75.59 कि.मी. आणि इटारसी-नागपूर-वर्धा- सेक्शनवर 509.05 कि.मी. असे एकूण 1111.29 किमी अंतरावर ताशी 130 किमी वेगाने ट्रेन चालवत आहे. तर, दौंड-वाडी विभागात 337.44 किलोमीटर अंतरावर ट्रेन्सचा वेग वाढवण्याचे काम सुरू आहे.
क्रमांक आणि वेग गाठलेली ट्रेन
12111- सीएसएमटी-अमरावती एक्स्प्रेस
12112 – अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस
12289- सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस
12290 – नागपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस
12859- सीएसएमटी -हावडा एक्स्प्रेस
12860 – हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस
12105 – सीएसएमटी-गोंदिया एक्स्प्रेस
12106 – गोंदिया-सीएसएमटी एक्स्प्रेस
12809 – सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस
12810 – हावडा- सीएसएमटी एक्स्प्रेस
22221 – हजरत निजामुद्दीन- सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस
22222 – सीएसएमटी – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस
तांत्रिक तपासणी पूर्ण
सुरक्षेच्या सर्व बाबी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणी केल्यानंतर या ट्रेन्सचा वेग वाढवण्यात आला आहे. यामुळे ट्रेन धावण्याची वेळ कमी होईल आणि वक्तशीरपणा सुधारेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.