पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाजवळ राजभवन येथे सकाळी मेट्रोचे साहित्य घेऊन जाणारा एक ट्रेलर उलटला. याचा परिणाम म्हणून बाणेर, औंध रोडवर शनिवारी सकाळीच वाहतूक कोंडी झाली. ही स्थिती दुपारपर्यंत कायम होती. यानंतर सायंकाळनंतर पुन्हा दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
आनंदऋषिजी चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामांसाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलीस ठाण्यासमोर यू-टर्न घेताना उलटला. पहाटेच्या पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळविण्यात आली. तर, या घटनेने दररोज विद्यापीठ चौकासमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.
सकाळी ऑफिससाठी बाहेर पडलेले नागरिक आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला. दरम्यान, सांगवीकडून विद्यापीठाकडं येणारी वाहतूक बंद करण्यात आली. तसेच ब्रेमेन चौकातून येणारी वाहतूक बोपोडीच्या दिशेने वळवण्यात आली . कंटेनर उलटल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
दुपारी दीडच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने कंटेनर आणि ट्रेलरवरुन पडलेला गर्डर हलविण्यास वाहतूक शाखेला यश आले. यानंतर वाहतूक थोड्यापार प्रमाणात सुरळीत झाली. मात्र, त्यानंतरही मेट्रोचे काम सुरु असल्याने दोन्ही बाजूने बॉटल नेकसारखी परिस्थिती असल्याने ही कोंडी रात्रीपर्यंत कायम होती.
“कंटेनर आणि त्यातून पडलेला गर्डर मोठा असल्याने तो हलवण्यासाठी मोठ्या क्रेनची व्यवस्था करावी लागली. तोपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी दीडच्या सुमारास कंटेनर आणि गर्डर हलवण्यात यश आले. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.” – शशीकांत बोराटे, उपायुक्त, वाहतूक शाखा