‘ही वेळ कोणावरच येऊ नये’; आदेश बांदेकरांनी सांगितला प्रवासादरम्यानचा अनुभव

Adesh Bandekar: अभिनेते आदेश बांदेकर ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे मागील अनेक वर्षांपासून सूत्रसंचालक आहेत. या शोमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र सध्या आदेश बांदेकर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकताच प्रवासादरम्यान आलेला एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर महामार्गावर प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाई-मुंबई प्रवास सुरू असताना खंबाटकी बोगद्यामध्ये १ तास अडकून राहणं…ही वेळ कोणावरच येऊ नये… पुन्हा प्रवास सुरू केल्याबद्दल खंबाटकी परिसर पोलीस आणि क्रेन चालकांचे धन्यवाद.”
View this post on Instagram
आदेश बांदेकर या व्हिडिओत सांगतात की, “हा भला मोठा कंटनेर खंबाटकी घाटातील बोगद्यामध्ये अडकला आहे. या एका कंटनेरमुळे संपूर्ण बोगद्यात ट्राफिक झालं असून सगळ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. त्या चालकाने कोणताही विचार न करता बोगद्यापेक्षा मोठा आकाराचा चालवून या मार्गाने प्रवास केला. त्याच्या चुकीमुळे सगळ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. असंख्य प्रवासी बोगद्यात अडकून पडले. पण, खऱ्या अर्थाने पोलिसांचे आभार मानले पाहिजेत. कारण, पोलीस व काही प्रवासी या सगळ्यांनी मिळून तो कंटनेर बाहेर काढला.”
“एकीकडे बोगद्यात कंटनेरमुळे अडचणी निर्माण झाल्या असताना दुसरीकडे बोगद्याच्या प्रवेशाद्वारसमोर आणखी एक कंटनेर उलटला होता. क्रेनच्या साहाय्याने त्या कंटनेरला बाजूला हटवण्यात आले. हे असेच अपघात होत राहिले, तर पाठीमागून येणारी एखादी रुग्णवाहिका अडकून यामुळे नाहक बळी जाऊ शकतो. देव या चालकांना सुबुद्धी देवो!” असं आदेश बांदेकरांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. या व्हिडिओत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचेही चित्र दिसत आहे. दरम्यान,आदेश बांदेकर यांच्या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे.





