पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आणखी ४ जादा दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट सुरु होणार असून पूर्वीचे ५ व नवीन ४ असे मिळून एकूण ९ कोर्ट कार्यरत होणार असल्याने न्यायसंस्थेचा व नागरिकांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. कामकाजास सोमवारपासून (दि. ११) सुरवात होणार आहे.
नव्याने नेहरूनगर येथे स्थलांतरित झालेल्या कोर्ट इमारतीत एकूण ११ कोर्ट रूम हॉल असून शहरासाठी ५ न्यायाधीश काम पाहत होते. न्यायाधीशांची अपुरी संख्या व कामाचा वाढता ताण याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ व कार्यकरणीतील माजी उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, माजी सचिव ॲड. गणेश शिंदे, माजी महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, माजी सहसचिव ॲड. मंगेश नढे, माजी खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, माजी ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, माजी सभासद ॲड. सौरभ जगताप, ॲड. स्वप्निल वाळुंज, ॲड. अक्षय केदार, ॲड. नितिन पवार, ॲड. पवन गायकवाड, ॲड. प्रशांत बचुटे यांनी वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय पुणे येथे जादा कोर्ट, तसेच सिनिअर डिव्हिजन व सत्र न्यायालय यासाठी पाठपुरावा केला. सदर पाठपुराव्याला यश आले असून सध्या स्थितीत मुंबई उच्च न्यायालय नव्याने ४ दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट यांचे सोमवारपासून प्रत्यक्ष कामाकाज सुरू होणार आहे.
पूर्वीचे ५ व नवीन ४ असे मिळून एकूण ९ कोर्ट कार्यरत झाल्याने न्यायसंस्थेचा व नागरिकांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच लवकरच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोर्ट देखील सुरू होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या व दाव्यांची संख्या लक्षात घेऊन लवकरच मोशी येथील जागेमध्ये विस्तृत कोर्टाचे भूमिपूजन होऊन इमारतीचे काम देखील सुरू होणार आहे. नव्याने सुरू होणाऱ्या जादा कोर्टामुळे दावे लवकर निकाली लागण्यास मदत होणार आहे.
पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या आजपर्यंतच्या आजी – माजी अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले असून सोमवारपासून (दि. १) नेहरूनगर येथील न्यायालयात नवीन चार प्रथमवर्ग न्यायधीश कार्यरत होत आहेत. बी. डी. चोखट, ए. एम. बागे, एम. ए. आवळे आणि व्ही. एन. गायकवाड असे नवीन चार प्रथमवर्ग न्यायाधीश कार्यभार स्वीकारत आहेत. त्यामुळे न्यायालयीन कामकाज जलदगतीने होणार असून खटल्यांचा निपटारा वेगाने होईल.
– ॲड. रामराजे भोसले, अध्यक्ष, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन.
आजी, माजी सदस्यांनी त्यासाठी पुठपुरावा केल्याने यश मिळाले आहे. सर्वांचे श्रेय असले तरी मागील समितीचे विशेष श्रेय आहे. त्यांनी पाठपुरावा केला. ६ कोर्ट मागितले होते. त्यातील ४ मिळाले आहेत. पुढील तीन-चार महिन्यांत उर्वरित मिळतील. सोमवारपासून नव्याने चार नवीन चार प्रथमवर्ग न्यायधीश कार्यरत होत असल्याने नागरिकांना लवकर न्याय मिळेल. केसेसचा लवकर निकाल लागेल. पेंडेंसी कमी होईल आणि नागरिकांना जलद न्याय मिळण्यास मदत होईल.
– ॲड. प्रमिला गाडे, अध्यक्ष, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशन.