पुणे- बनावट सह्या, कोरे धनादेश आणि कागदपत्रांच्या आधारे पाच कोटी रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी वैशाली हॉटेलच्या निकिता शेट्टी यांचा पती आणि बँक अधिकाऱ्यासह तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांच्या न्यायालयात या अर्जाची सुनावणी झाली. विश्वजीत विनायक जाधव (वय ४१) यांच्यासह कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी, डीएसए आर. आर. फायनान्सचे रवी परदेशी यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
वैशाली हॉटेलच्या निकिता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांनी चौधरी आणि परदेशी यांच्या मदतीने पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज प्रक्रियेसाठी फिर्यादी यांचा फ्लॅट त्यांच्या परवानगीशिवाय तारण ठेवला व बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतले, अशी फिर्याद देण्यात आली आहे. आरोपींच्या जामीन अर्जास सरकारी वकील अॅड. प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. मूळ फिर्यादी यांच्यावतीने अॅड. निखिल अनिल मालाणी आणि अॅड. उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले.