पुणे – केंद्रशासनाच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त महापालिकेकडूनही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम यंदाही राबविण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या माध्यमातून पुणेकरांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी ही माहिती दिली. आयुक्त विक्रमकुमार यावेळी उपस्थित होते. या उपक्रमात दि. 9 ऑगस्ट अर्थात क्रांतिदिन ते 20 ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही नागरिकांना घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय देशाच्या रक्षणासाठी बलिदान केलेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिल्प उभारण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे नदीकाठ सुधार योजनेच्या बंडगार्डन येथील पथदर्शी टप्प्यात हे शिल्प उभारण्यात येईल, असे डॉ. खेमनार यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.