पुणे – विशेष दक्षतेमुळे नाव वगळण्याच्या तक्रारीतच नाही

पुणे – मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारयादीतून अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. यावेळी याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. यावेळी मतदारयादीतून नाव वगळण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने पूर्णप्रक्रियेचे पालन केले. त्यामुळे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून मतदार यादीतून नाव वगळण्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

एकतास आधी मॉक पोल
शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. त्याआधी एकतास आधी मतदान केंद्रांवर मॉक पोल घेण्यात आला. यावेळी ज्या मतदान यंत्रामध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली अथवा मशीन बंद असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणच्या मशीन तत्काळ बदलण्यात आल्या. शिरूर व मावळमध्ये चार हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी फक्त 30 ते 35 मशीन बदलण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर एकास अटक
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एका ठिकाणी एक व्यक्ती 48 हजार रुपये वाटप करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या व्यक्तीस अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल
शिरूर येथे एका मतदान केंद्रावर मतदान करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत असल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. प्राथमिक स्तरावर चौकशी करण्यात येत असून, कोणत्या मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे, याची माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.