#IPL2019 : हैदराबादची पंजाबवर 45 धावांनी मात

हैदराबाद -आयपीएलच्या बाराव्या मोसमातील लढती रंगतदार स्थितीत आल्या असून आज झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाबचा 45 धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने “प्ले ऑफ’मधील आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 6 बाद 212 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबला 20 षटकांत 8 बाद 167 धावांपर्यंत मजल मारता आली.

आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. सलामीवीर ख्रिस गेलचा अडसर खलिल अहमद याने तिस-याच षटकात दूर केला. त्यानंतर मयंक अग्रवाल (27) आणि निकोलस पुरन (21) यांनी थोडाफार प्रतिकार केला. दुस-या बाजूने के. राहुल याने 56 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार खेचत 79 धावांची खेळी केली. पण ही खेळी अपयशी ठरली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार आर. अश्‍विन याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना महागात पडला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी पहिल्या विकेटसाठी 6.2 षटकांतच 78 धावांची भागिदारी केली. साहाने 13 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार खेचत 28 धावांची खेळी केली. त्याला एम. अश्‍विन याने सिमरन सिंगकरवी झेलबाद केले.

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या मनीष पांडे यानेही धुवाधार फलंदाजी केली. त्याने वॉर्नरच्या सोबतीने दहा षटकांतच संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यानंतर आर. अश्‍विन याने सोळाव्या षटकांत दोन विकेट घेत हैदराबादला झटके दिले. डेव्हिड वॉर्नरने 56 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार खेचत 81 धावांची निर्णायक खेळी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.