चालू वर्षांत सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
पुणे – “शेरशाह’ चित्रपट आठवतोय? कारगिर युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा या लष्करी अधिकाऱ्याने आपल्या प्राणांची आहुती देत, भारतीय सैन्याला मिळवून दिलेला विजयाचा प्रवास दाखविणारा चित्रपट अनेकांना देशप्रेमाची शिकवण देऊन गेला. भारतीय सैन्याच्या अशाच आणखी काही शौर्यगाथा आगामी काळात पहायला मिळणार आहेत.
भारतीय सैन्य दलाच्या शौर्य आणि धाडसाची गाथा आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र, आता विविध सैनिकी मोहिमांचा थरार नागरिकांना चित्रपटांमधून अनुभवायला मिळणार आहे. चालू वर्षात लष्कर, नौदल, हवाई दल, सैनिकी संशोधन संस्था आणि गुप्तचर संस्थांच्या विविध मोहिमांवर आधारित तब्बल सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
आपल्या जीवाची पर्वा न करता, सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणारा लष्करी जवान असो, दूरवर पसरलेल्या समुद्री सीमांचे रक्षण करणारे नौदल जवान असो, उंच आकाशात भरारी घेत देशाच्या आकाश सीमांचे रक्षण करणारे हवाई दलाचे जवान असोत, अथवा गुप्तचर विभागांमधील सैन्याधिकारी यांच्या जीवनाची झलक आणि कठीण परिस्थितीचा सामना करत विविध मोहिमांमध्ये त्यांनी केले कार्य हे हा चित्रपटांच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे सैनिकी मोहिमांवर आधारित या चित्रपट, माहितीपटांसाठी संरक्षण मंत्रालयानेही पुढाकार घेतला असून, गेल्या वर्षभरात मंत्रालयाकडे आलेल्या 18 पैकी 16 प्रस्तावांना मान्यता दिली आहे. यामध्ये 9 चित्रपट आणि सात माहितीपटांचा समावेश असणार आहे. तर, एक प्रस्ताव प्रलंबित आणि एक नाकारला असल्याचीही माहिती मंत्रालयाने दिली.
यावर्षी प्रकाशित होणाऱ्या सैनिकी चित्रपटांमध्ये मुंबईमधील 26/11 हल्ल्यावर आधारित चित्रपट, हवाई दलाच्या “गरुड’ या स्पेशल फोर्सवर आधारित चित्रपट, अपहरण आणि सुटका यावर आधारित चित्रपट, “बायोपिक’ आणि युद्धावर आधारित चित्रपटांचा समावेश आहे.
वस्तूस्थिती दर्शविण्यास मदत
अलीकडील काळात प्रदर्शित झालेल्या “गुंजन’सारख्या काही चित्रपटांमधून सैन्य दलाबाबत चूकीचे चित्रण करून दलाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार रोखण्यासाठी तसेच चित्रपटांमधून वस्तूस्थिती दर्शविण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने चित्रपट निर्मात्यांना “ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.