पुणे – पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटीचे पुढील शैक्षणिक वर्षाचे संभाव्य वेळापत्रक राज्य सीईटी सेलने शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी असणारी “एमएचटी-सीईटी’ दि. 16 एप्रिल ते 2 मे 2024 या कालावधीत होणार आहे. संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्याने त्यानुसार विद्यार्थ्यांना सीईटीची तयारी करणे शक्य होणार आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या सीईटीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जातो.
एकूण 20 अभ्यासक्रमाच्या सीईटी घेतली जाणार आहे. त्याचे संभाव्य वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. व्यावसायिक अभ्यासक्रमात अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट, विधी, बी.एड. व एम.एड., एमबीए, एमसीए, बीएसस्सी नर्सिंग आदींचा समावेश आहे.
अन्य परीक्षांचे नियोजन
बीएड-एमएड सीईटी दि. 2 मार्च रोजी होईल. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रम सीईटी 11 ते 13 मार्च, तर पाच वर्षीय विधीची सीईटी 7 ते 8 मे, एमबीए सीईटी 23 ते 24 मार्च, तर एमसीए सीईटी 30 मार्च रोजी होणार आहे. पदवीची हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी 13 एप्रिल रोजी होणार आहे. एकूण 20 सीईटीपैकी दोन सीईटी ऑफलाइन, तर 18 सीईटी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.