थायलंडमध्ये क्रांती
बॅंकॉक, दि. 20 – थायलंडमध्ये लष्कराने सत्ता आपल्या हाती घेतली आहे, असे थाई रेडिओने जाहीर केले आहे. पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. थायलंडचे उपपंतप्रधान ऍडमिरल संगद चालोस्यू यांनी लष्कर आरमार व हवाई दलाचे वतीने सत्ता हाती घेतल्याची घोषणा केली आहे. मात्र त्याचवेळी लष्कराने असे जाहीर केले आहे, की राजसत्तेचे रक्षण लष्कर करील. महत्त्वाच्या ठिकाणी सैनिकांचा पहारा आहे.
पंतप्रधानांना अटक
पदच्युत पंतप्रधान थानिन क्राइविचिएन यांना त्यांच्या सहकारी मंत्र्यांसह तुरुंगात ठेवण्यात आले आहे, असे विश्वसनीय गोटातून सांगण्यात आले आहे.
फटाक्यांच्या दुकानांपाशी धूम्रपान करण्यास बंदी
पुणे – शोभेची दारू व फटाक्यांची दुकाने असलेल्या जागेपासून 50 फुटाच्या परिघात धूम्रपान करण्यास मनाई करणारी आज्ञा पुणे पोलीस कमिशनर एम. जी. गवई यांनी मुंबई पोलीस ऍक्ट प्रमाणे दिली आहे. तसेच शोभेची दारू विक्रीच्या दुकानापासून 100 फूट परिघात बाण, रॉकेट वगैरे उडविण्यास बंदी केली आहे.
पाकचे संघराज्य सुरक्षा दल रद्द
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान भुट्टो यांनी निर्माण केलेले संघराज्य सुरक्षा दल सध्याच्या लष्करी राजवटीकडून गुंडाळण्यात येत आहे, असे पाकिस्तान नभोवाणीवरून सांगण्यात आले.