पुणे विद्यापीठाने कॅम्पसमधील शैक्षणिक विभागातील विविध अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ केल्याच्या कारणावरून विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याउलट विद्यापीठाने अद्यापपर्यंत कोणतीही शुल्क वाढ केली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शुल्कात वाढ झाली आहे की नाही, यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिपटीने वाढ केल्याची तक्रार विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.
विद्यापीठाने त्वरित शुल्क वाढ मागे घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा येत्या चार-पाच दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनेने दिला आहे. खुद्द कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी तीन दिवसांपूर्वी विद्यापीठाचे उत्पन्न घटल्याने शुल्कवाढ करावे लागले आहे, असे सांगितल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे शुल्कवाढवरून संभ्रम वाढला आहे. दरम्यान, विद्यापीठाने कोणतीच शुल्कवाढ केली नसल्याचे शैक्षणिक प्रवेश विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच करोनाच्या काळात गेली दोन वर्षी कोणतीचा शुल्कवाढ न करता विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे, असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक शुल्क वाढ केलेली नाही. विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कुठलाही प्रकारचा आर्थिक ताण कसा कमी करता येईल. याबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका राहिलेली आहे. विद्यापीठासमोर कुठल्याही प्रकारे शैक्षणिक शुल्क वाढ करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसून आहे त्या शुल्का मध्येच विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा गैरसमज न करता शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे.
– राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ