पुणे –लक्ष्मी आणि कुमठेकर रस्ता परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर ड्रेनेजलाइनचे काम सुरू आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पत्र्या मारुती चौक ते नागनाथ पार चौकापर्यंत ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे व्यापारी पेठेतील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. याशिवाय, बेशिस्त वाहन पार्किंगमुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
मार्च महिन्यात रमणबाग चौक ते पत्र्या मारुती चौकदरम्यान ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर खोदाईचे काम टप्याटप्याने सुरू असून नागनाथ पारापर्यंत खोदकाम सुरू आहे. ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता अर्धवट पद्धतीने बुजवून त्यावर सिमेंटचा थर टाकण्यात येत आहे. ठेकेदारांना कामाची पूर्तता करण्यास नेमका किती कालावधी लागेल, याचीही माहिती रहिवासी तसेच व्यापाऱ्यांना नसल्याने गेल्या दीड महिन्यांपासून या भागातील रहिवाशांसह सर्वांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना खोदाई सुरू करण्यात आली. दीड महिना उलटूनही खोदाई तसेच ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण होत नसल्याने या भागातील रहिवासी तसेच व्यापारीही मेटाकुटीला आले आहेत.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या मध्यभागात बाहेरगावाहून नागरिक येतात. तुळशीबाग, मंडई परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना कोंडीतून वाट काढून जावे लागत आहे. कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता परिसरातील गल्लीबोळात बेशिस्तपणे वाहने लावण्यात येत असल्याने कोंडीत भर पडत आहे. टिळक रस्त्यावरून लक्ष्मी रस्त्याकडे येणारे वाहनचालक खजिना विहीर चौक, नागनाथ पार चौकमार्गे जातात. नागनाथ पार, शगुन चौक ते पत्र्या मारुती चौकदरम्यान खोदाईची कामे सुरू असल्याने वाहनचालक गल्लीबोळातून जातात. शनिवारी आणि रविवारी या भागात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. खरेदीसाठी आलेले नागरिक वाहतुकीस बंद केलेल्या रस्त्यांच्या परिसरात बेशिस्तपणे वाहने लावतात. गल्ली बोळातून पीएमपी, मोटारी जात असल्याने सध्या या भागातून चालणे देखील अवघड झाले आहे, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.