पुणे – तीन दिवसांवरच दिवाळी आहे आणि त्यापूर्वी खरेदीसाठी शेवटचाच रविवार असल्याने बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. आकाशकंदिलापासून ते फटाके, कपडे, दागिने आणि अन्य अनेक गोष्टींच्या खरेदीसाठी नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडाली.
तुलनेने नियोजन झाल्याने वाहनांपेक्षा फक्त पादचाऱ्यांची गर्दी दिसून आली. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस येत्या गुरूवारी आहे. म्हणजे गुरूवारपासूनच दिवाळीला सुरूवात होत आहे. त्याआधी सगळी खरेदी उरकण्यासाठी आणि त्यासाठी शेवटचाच रविवार असल्याने नागरिकांनी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी केली.
अनेक प्रकारच्या पणत्या, चित्रे, आकाशकंदील, तयार किल्ले या पासून ते लहानमुलांचे ड्रेस, मोठ्यांचे कपडे, ज्वेलरी यासह अनेक गोष्टींची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत दाखल झाले आहेत. रविवार असल्याने सकाळपासूनच गर्दी होती. परंतु सायंकाळी चार वाजल्यानंतर ही गर्दी प्रचंड वाढली. त्यामुळे उलाढालदेखील झाली.
आकाश कंदिलांमध्येही आंदोलनाचे “रिफ्लेक्शन’
गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्याचे “रिफ्लेक्शन’ दिवाळीतही दिसून येत आहे. आकाशकंदिलांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र, त्यांची राजमुद्रा, मेघडंबरीखाली सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज अशी चित्रे दिसून आली. तसे भगव्या रंगाचे आकाशकंदील विक्रीसाठी आलेले दिसले. समाजातील घडामोडीचे प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या काळात देखाव्यांच्या माध्यमातून उमटते. परंतु दिवाळीत ते उमटणे हे विशेष आहे.
रविवार पेठही खुली
रविवार पेठ ही साधारणपणे दर रविवारी बंद असते. परंतु दिवाळी असल्याने खरेदीदारांना नाराज करायचे नाही म्हणून रविवारपेठेतील अनेक दुकाने खुली ठेवण्यात आली होती. याशिवाय लाइटच्या माळा, बल्बज आणि विद्युत सजावटीच्या वस्तूंची दुकानेही रविवारी सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांना आयती पर्वणी मिळाली. शिवाय, किरकोळ विक्रेत्यांनाही हुरूप आला.