मुंबई – आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी दोन दिवसांपूर्वी मांडलेल्या एका भूमिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. आपले मत मांडताना त्यांनी त्यात द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचाही उल्लेख केल्यामुळे आता या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुढे सरसावले असून त्यांनी शाह यांना दिलेल्या उत्तरांमुळे या दोन दिग्गजांमधील वाद आता अशोभनीय वळणावर गेला आहे.
गदर आणि द काश्मीर फाइल्स, द केरळ स्टोरी यासारख्या चित्रपटांना मिळणारे यश अस्वस्थ करणारे आहे, असे नसीरूद्दीन शाह यांनी म्हटले होते. या चित्रपटांना मिळणारी लोकप्रियता त्यांना खटकते आहे त्याचे कारण या चित्रपटांतून दुही निर्माण करणारे विचार मांडले गेले आहेत अशा आशयाची त्यांची भूमिका होती. तथापि, शाह यांनी आपल्या चित्रपटाचे नाव घेतल्यामुळे आणि एकूणच त्यांची भूमिका अप्रस्तूत वाटल्यामुळे अग्निहोत्री यांनी त्यांना उत्तर दिले आहे.
एका वाहिनीशी बोलताना त्यांना याबाबत विचारल्यावर अग्निहोत्री म्हणाले की काश्मीर फाइल्स पाहून शाह यांचा पर्दाफाश झाला असावा. मी नसीर साहेबांचा मोठा फॅन असून माझ्या ताश्कंद फाइल्स या चित्रपटातही त्यांनी काम केले. ते अचानक इतके म्हातारे कसे झाले याचे मला आश्चर्य वाटते. त्यांचे विधान म्हातारपणामुळे असेल तर मला याबद्दल काही बोलायचे नाही.
अग्निहोत्री पुढे म्हणाले की कधी कधी काही लोक बऱ्याच गोष्टींमुळे निराश होतात. कदाचित काश्मीर फाइल्समधील सत्याचा आता त्यांना सामना करावा लागत असेल. दुसऱ्याच्या कलाकृतीद्वारे असा आपला पर्दाफाश होणे बऱ्याचदा लोकांना रूचत नाही. त्यामुळे नसरूद्दीन शाह जे काही बोलत आहेत त्यात काहीतरी गडबड आहे. काहीतरी त्यात चुकीचे आहे. नरसंहाराचे समर्थन करणाऱ्या चित्रपटांतून काम करून ते खुश होते. आपल्या धर्मामुळे, नैराश्यामुळे किंवा अन्य कोणते कारण असेल त्यामुळे कदाचित ते दहशतवाद्यांचे समर्थन करणे पसंत करत असतील. मात्र मी तसा नाही. त्यामुळे नसीरूद्दीन शाह काय म्हणतात याची मला फिकिर नाही. दहशतवादाच्या प्रती माझी भूमिका शून्य सहिष्णुतेचीच असेल असं अग्निहोत्री यांनी स्पष्ट केलं.