पुणे – कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा अनॅलिटीक्सच्या युगात पारंपरिक लेखापरीक्षण बदलणार आहे. युवा सीए अभ्यागतांनी सतत कौशल्य वृद्धीवर भर दिला पाहिजे. असे प्रतिपादन संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले. दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे आयोजित दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ, दीक्षांत सोहळ्याचे समन्वयक चंद्रशेखर चितळे, उमेश शर्मा, पुणे शाखेचे अध्यक्ष राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा अमृता कुलकर्णी, खजिनदार ऋषीकेश बडवे, प्रणव आपटे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. शिकारपूर म्हणाले, “आगामी दशकात जपानमध्ये करिअरच्या अमाप संधी असल्यामुळे जपानी भाषा व त्या देशातील वित्त व्यवस्थापनाचे मानक अभ्यासून त्यात प्राविण्य मिळवले, तर अनेक युवकयुवती जपानी उद्योगात करिअर करू शकतात, ‘
आमदार मिसाळ म्हणाल्या, “सनदी लेखापाल (सीए) यासारख्या अवघड परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी आणि त्याना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या पालकांचे कौतुक आहे. करोनाच्या संकटानंतरही देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. यामध्ये सीए मंडळी महत्त्वाची भूमिका बजावत असून, येणाऱ्या काळात तुम्हालाही यासाठी योगदान द्यायचे आहे.’