पुणे, दि. 14 -लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुणे-सिंगापूर विमानसेवा दि. 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या चार दिवस ही उड्डाणे होणार आहेत. यामुळे युरोप आणि इतर देशांत जाणाऱ्यांना सुविधा उपलब्ध होणार आहे. पुण्यातून परदेशांत सुरू झालेली दुबईनंतरची ही दुसरी विमानसेवा ठरणार आहे.
पुण्याचा औद्योगिक विकास झाल्यामुळे पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्या सुरू झाल्या आहेत. तसेच पुण्याची “आयटी हब’ म्हणूनही ओळख आहे. त्यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोहगाव विमानतळावरून दिवसाला देशांतर्गंत 80 ते 85 विमाने उड्डाण करतात. तर, तेवढीच विमाने पुण्यात येतात. पुण्यातून परदेशात फक्त दुबईला विमान सेवा सुरू आहे. इतर देशात जाण्यासाठी मुंबई किंवा दिल्लीला जावून पुढचा प्रवास करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांकडून युरोपीय देशात थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुणे-सिंगापूर विमान सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. पुणे-सिंगापूर विमान सेवा सुरू करण्यास विस्तारा एअरलान्सला काही दिवसांपूर्वीच नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने परवानगी दिली होती.
पुणे-सिंगापूर विमानसेवा सुरू होणार असल्याने पुणेकरांना याचा फायदा होणार आहे. तसेच वेळेची बचत होणार आहे. सिंगापूर बरोबरच इतर देशात विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.
– संतोष ढोके, विमानतळ संचालक