पुणे – ‘सीरम इन्स्टिट्यूट’ ही संस्था पुणे शहरात आहे. पुण्यामुळे या संस्थेचे नाव जगभरात पोहोचलेले आहे. त्यामुळे या संस्थेने सामाजिक जाणीवेतून पुणेकरांसाठी मोफत लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी एकमुखाने केली आहे. याबाबतचे पत्र महापालिकेच्या वतीने लवकरच “सीरम’ला देण्यात येणार आहे.
राज्यात सर्वाधिक करोनाचा संसर्ग पुणे शहर आणि जिल्ह्यात आहे. तसेच दिवसेंदिवस गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना लस देणे गरजेचे आहे. करोना प्रतिबंधीत कोविशिल्ड या लसीची निर्मिती करणारी “सीरम इन्स्टिट्यूट’ ही संस्था पुण्यात आहे.
या संस्थेच्या प्रसिद्धीमध्ये पुण्याचाही वाटा आहे. याचा विचार करून “सीरम’ने सामाजिक भावनेतून पुणेकरांसाठी कोविशिल्ड लस मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बुधवारी महापौर निवासस्थानी झालेल्या पदाधिकारी, गटनेते अणि प्रशासनाच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखाने केली.