पुणे, दि. 23 -दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांकडून तब्बल 17 हजार 325 वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 11 हजार दुचाकींची संख्या आहे. यानंतर कार, रिक्षा आदी वाहनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील चार वर्षांत दिवाळीच्या कालावधीत यावर्षी विक्रमी विक्री झाल्याचे पाहायला मिळते.
दिवाळीनिमित्त वाहन खरेदीचे प्रमाण अधिक असते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर वाहन घरी नेण्यासाठी नागरिकांकडून मागील काही दिवसांपासून बुकींग केले जाते. विशेषतः दिळीच्या अगोदर वाहन बुकिंग करून लक्ष्मीपूजनच्या दिवशी वाहन घरी नेण्यासाठी नागरिक प्राधान्य देतात. यंदा 6 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) 17 हजार 325 वाहनांची नोंदणी झाली आहे. दिवाळीच्या मुहर्तावर वाहन वितरकांकडून (शोरूम) देखील नागरिकांना आकर्षक अशी सुट देण्यात आली होती. याशिवाय वाहनांवर ऍक्सेसरीज आणि अन्य वस्तू मोफत दिल्या जात होत्या. यामुळे मागील काही दिवसांपासूनच शहरातील शोरूममध्ये नागरिकांची गर्दी पाहण्यास मिळाली. दुचाकींचे शहर अशी ओळख झालेल्या पुण्यात यंदाही सर्वाधिक दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. यंदा सतरा हजारांतील तब्बल 11 हजार 143 वाहने ही दुचाकी आहेत. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांवर दुचाकींची अधिक भर पडली आहे. दुचाकींमध्ये इलेक्ट्रीक वाहनांची संख्याही मोठी आहे
.